|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री भाऊ समर्थ ||
पुस्तक : वटवृक्षाच्या छायेत
लेखक : श्री. जगदीश जाधव
पृष्ठ संख्या : ३६०
बाईंडिंग : परफेक्ट बाईंडिंग
स्वागत मूल्य : ४५०/- + पोस्टल चार्जेस्
लेखकाचे मनोगत
‘ वटवृक्षाच्या छायेत ’ हा एका बाह्यात्कारी सामान्य व्यक्तीप्रमाणे व्यवहार करणाऱ्या परंतु अंतर्यामी असामान्यत्वाचे धनी असणाऱ्या, लोककल्याणास्तव स्वतःचे अवघे आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या एका अलौकिक संत पुरुषाचा जीवनगौरव आहे.
स्वामी समर्थ कृपांकित व साई चरित्रकार कै. गोविंद दाभोळकर यांचे नातू असलेले सद्गुरु परमपूज्य गजानन वालावलकर उर्फ भाऊ महाराज यांचे हे जीवन चरित्र केवळ त्यांच्या भक्तपरिवारास आनंददायी न ठरता आध्यात्मिक कल असणाऱ्या साऱ्याच भाविकांना व चोखंदळ वाचकांना प्रासादिक ठरेल याची मला खात्री वाटते.
या पुस्तकाचे विशेष पैलू असे की भाऊ महाराज यांच्या चरित्रकथानाबरोबरच त्यांची सहज सुलभ पारमार्थिक व व्यावहारिक शिकवण विविध आध्यात्मिक ग्रंथांच्या आधारे येथे उलगडून प्रस्तुत केली आहे. या पवित्र ज्ञानगंगाजलाचे प्रोक्षण हे आपणां सुबुद्ध वाचकांना खचितच आल्हाददायी व ज्ञानवर्धक ठरेल.
भाऊ महाराजांचे पारलौकिक सामर्थ्य दर्शवणारे स्वानुभव व संकटकाळी भक्तांचा प्रतिपाळ करणारे गुरूंचे भक्तांना आलेले अनुभव देखील या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.
मी २३ वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात ( गुन्हे अन्वेषण विभाग ) नोकरी केली. त्या कार्यकाळात गुन्ह्यांच्या तपासात माझ्या पराकोटीच्या प्रयत्नांती देखील ज्या वेळी अपयश येत असे किंवा अट्टल गुन्हेगारांना अटक करताना आम्हां पोलीस अधिकाऱ्यांना ज्या जीवावर बेतणाऱ्या थरारनाट्याला सामोरे जावे लागत असे त्या प्रत्येक प्रसंगी माझ्या सद्गुरुंच्या कृपेचे व आशीर्वादाचे अलौकिक अभेद्य कवच माझे रक्षण करीत असे. माझ्या सद्गुरूशक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय व रक्षाकवचाशिवाय या सर्व कमालीच्या मानसिक दबाव आणणाऱ्या व शारीरिक शक्तीचा कस लावणाऱ्या कार्यामध्ये प्रत्येक वेळी हमखास यश मिळणे हे केवळ माझ्या स्वतःच्या कर्तबगारीवर अशक्यप्राय होते. अश्या काही यशस्वी झालेल्या चित्तथरारक गुन्हे अन्वेषण प्रसंगांचे वर्णन हे वाचकांस वाचण्यास अतिशय रोचक वाटेल.
काव्य विभागात प्रत्यक्ष भाऊ महाराज, त्यांची सिद्धहस्त कवयित्री सुकन्या तसेच मला स्फुरलेल्या काही मोजक्या ईश व गुरूभक्तीपर काव्यरचना सादर केल्या आहेत. या वाचकांच्या तरल मनाला खचितच भावतील.
एकूण कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोग या सार्यांचा सुंदर मिलाफ असलेले हे गुरुचरित्र आपणांसारख्या सदभिरुचीयुक्त सत् जनांपुढे सादर करताना मला कर्तव्यपूर्तीचा आनंद व समाधान लाभत आहे.
अंततः येथे हेही नमूद करणे मी उचित समजतो की या चरित्र ग्रंथाच्या विक्रीतून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग हा सद्गुरू भाऊ महाराज प्रेरित ‘ श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट ’ या सेवाभावी संस्थेद्वारे कार्यान्वित होणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांकरिता करण्यात येणार आहे त्यामुळे या गुरुचरित्राचा लाभ प्राप्त केल्यास वाचकांना केवळ दर्जेदार आध्यात्मिक साहित्यकृतीच्या वाचनाचाच नाहीतर अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ अशा बालकांच्या व युवकांच्या शैक्षणिक उन्नयनामध्ये स्वतःचा हातभार लागल्याचा दुहेरी आनंद प्राप्त होईल.
आपला नम्र सेवक
जगदीश जाधव
संपर्क :
श्री. कुलदीप सांगळे
८६९३८६७५९०
Reviews
There are no reviews yet.